विशाल नुकताच सिंगापूरला आला होता. त्याची राहण्याची सोय होई पर्यंत तो माझ्याकडे राहणार होता. त्याचे ऑफिसही माझ्या ऑफीसच्या शेजारच्या इमारतीमधे असल्यामुळे सकाळी आम्ही एकत्रच ऑफीसला गेलो. आधीच ठरल्या प्रमाणे मी त्याला दुपारी फुडकोर्ट जवळ भेटलो. विशाल सिंगापूरला येण्याआधी पासूनच त्याला माझे फुडकोर्ट बद्दलचे प्रेम माहीत होते. ऎकीव वर्णन कितीही माहीत असले तरी फुडकोर्ट बघण्याचा त्याचा हा पहिलाच अनुभव होता.
फुडकोर्ट मधे शिरताच नकळतच विशालचा हात नाकाजवळ गेला. रोस्टेड डिलाईटच्या स्टॉलवर टांगलेले रोस्टेड चिकन आणि डक टांगलेले पाहून विशालने माझ्या कडे डोळे विस्फारून पाहिले. तसे त्याने गावी कसायाच्या दुकानात टांगलेले बोकड पाहिले होते पण ते लांबूनच. मला त्याच्या चेहर्यावर माझा भूतकाळ दिसत होता आणि मला हे ही माहीत होते की “soon he is going to be fine and get used to food-court”
त्याचा आज पहिलाच दिवस असल्यामुळे मी विशालला भारतीय स्टॉलवर घेऊन गेलो. ओळखीचे खाद्यप्रकार पाहून आणि खाद्यगंध हुंगून विशालला हायसे वाटले. भाजून टांगलेले पक्षीगण पाहून विशालची अभक्ष्य भक्षणाची इच्छा उडाली होती म्हणून त्याने शाकाहारी जेवण घेतले आणि बसण्यासाठी जागा शोधू लागला. पण आसपासच्या टेबलांवर टिश्यू किंवा वर्तमानपत्र रूपी “जागा पकडण्यासाठी टाकलेले रूमाल” पाहून त्याचे डोळे विस्फारले. त्याने मला नजरेनेच “इथे ही?” विचारले. माझे जेवण घेताघेता मी त्याला मानेनेच “मग काय!!” असे म्हणत पलिकडे रिकामी असलेले टेबल दाखविले. अनरिझर्वड टेबल बघताच विशालने दोन रिझर्वड टेबलांच्या मधून सूर मारून टेबल अडविले आणि एका विजेत्याच्या आवेशात त्याने माझ्याकडे पाहिले. मी हसून त्याच्या विजयाला दाद दिली आणि त्याच्या बरोबर जाऊन जेवायला बसलो.
जेवता जेवता विशालने फुडकोर्टबद्दलची प्रश्नावळी माझ्यासमोर मांडली. “इथे लोक डबे आणत नाहीत का?”, “हे लोक चॉपस्टीक ने कसे जेवतात?” “इतक्या वासात तुम्ही कसे जेवता?”, “फुडकोर्ट कोण चालवतं?”, “स्टॉल भाड्याने कसे मिळतात?” इत्यादी इत्यादी. मी दिलेली उत्तरे तोंडी लावत विशालने जेवण संपविले. लंच टाईमही संपत आला होता. विशालचे जेवण संपताच त्याने टेबलावर पडलेले अन्न टिश्यूने उचलून ट्रे मधे टाकले आणि त्याने मला विचारले ट्रे बे कुठे आहे. माझ्या चेहर्यावर छापलेला प्रश्न वाचून त्याने टेबलावर चिटकवलेल्या स्टीकर कडे माझे लक्ष वेधले. “बी ग्रेशीअस… कीप युअर ट्रे अॅट ट्रे बे”.
तो ट्रे घेउन उठणार इतक्यात टेबल साफ करणारी आजी आली आणि त्याच्या हातातला ट्रे घेऊ लागली. त्या आजीचा थरथरणारा हात पाहून विशाल तिला म्हणाला, “इट्स ओके आंटी… आय वी कीप माय ट्रे अॅट ट्रे बे.” तो ट्रे देत नाहीये हे बघून ती आजी त्याच्या अंगावर “चायनीस-सिंग्लीश” मधे खेकसली आणि तिने तो ट्रे हिसकावून घेतला. तिचे ते अवसान बघून विशालचा चेहरा कसानुसा झाला आणि तो “घडला काय गुन्हा?” अशा नजरेने माझ्याकडे पाहू लागला. त्याचा ट्रे तिच्या भांडी गोळा करायच्या गाडीत टाकून तिने मोर्चा माझ्या ट्रे कडे वळविला. मी माझा ट्रे तिच्या हातात उचलून दिला आणि तिचे आभार मानले. ती अजूनही स्वतःशी पुटपूटत निघून गेली.
“अरे ती बाई तुझ्या आजी पेक्षाही जास्त वयाची आहे. तिला कसे तुम्ही तुमचे उष्टे ताट उचलायला लावता? ती निघून जाताच विशाल बरसला.
“मित्रा मला कळते आहे तुझी चिडचिड… पण जरा विचार कर.. ती आजी इथे ताशी ५-६ डॉलर पगारावर काम करते. दिवस भरात तिला जे काही ३०-३५ डॉलर मिळतात त्यात तिचा उदरर्निवाह होतो. जर आपण सगळ्यांनी जर आपापली ताट उचलूने ठेवली तर या फूडकोर्टला तिची गरज उरणार नाही. आणि तसे झाले तर तिचे जगणे अजून कठीण होऊन बसेल…” मी त्याला समजावणीच्या सुरात सांगितले.
“पण ह्या इतक्या वयाच्या लोकांना ही असली कामं करावी का लागतात? ह्यांच्या घरचे लोक ह्यांचा संभाळ का करत नाहीत? की हे सगळे लोक अनाथ आहेत?” पुन्हा एकदा विशालच्या प्रश्नांची सरबत्ती.
“राजे तुम्ही आत्ताच सिंगापूर मधे आला आहात. इथले सोशिओ-इकॉनॉमिक प्रॉबलेम्स वेगळे आहेत. ते समजून घ्यायला थोडासा वेळ द्यावा लागेल. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेव. जो पर्यंत तुमचे हात चालू आहेत तो पर्यंतच तुम्ही इथे जगू शकता. तुमचे हात थांबले की तुमचे उत्पन्न थांबते. आणि उत्पन्न थांबले की पर्यायाने तुम्ही थांबता.” मागील तीन वर्षात मला उमगलेले सर्वसामान्य सिंगापूरी माणसाचे जगण्याचे तत्वज्ञान त्याला सांगण्याचा (पर्यायाने स्वतःला परत सांगण्याचा) माझा प्रयत्न…
“हे बरोबर आहे का? या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे ही नाहीये. पण आहे हे असे आहे हे लक्षात घे.” त्याच्या अपेक्षीत प्रश्नाचे उत्तर आधीच देऊन मी तो त्याचा बरोबरचा या विषयावरचा संवाद संपविला आणि आम्ही फुडकोर्टच्या बाहेर पडलो. माझ्या उत्तर देण्याच्या स्टाईल वरून त्याला माझी चिडचिड झाली आहे हे कळण्या इतका सुज्ञ विशाल नक्कीच होता. म्हणूनच फुडकोर्ट मधून बाहेर पडताच “चल संध्याकाळी भेटू” म्हणत तो त्याच्या ऑफीसच्या दिशेने मार्गस्थ झाला.
सर्वसामान्य सिंगापूरी माणसाच्या जीवनाचे तत्वज्ञान, आपले संस्कार, आपल्याकडेही बदलत चाललेली कुटुंब पद्धती, एकटे पडत चाललेले आजी आजोबा, दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई आणि जगण्याची लढाई… कदाचित भविष्यात आपल्याकडेही अशी फुडकोर्ट असतील… आणि तिथे आपल्या पैकी कोणाचे तरी आजी आजोबा आपले उष्टे ताट उचलतील… विचारानेच अंगावर सर्रकन काटा आला. बरं झालं आपल्याकडे फुडकोर्ट्स नाहीयेत ते…
फार काही खास लेख नाही. काही तरी इंटरेस्टिंग लिहा
खुप छान लेख! खरंच इकडच्या फुडकोर्टात वयस्कर माणसांना काम करताना पाहून जीव तुटतो.